Pune News : पुण्यात Lockdown नकोच; व्यापाऱ्यांचे अजित पवारांना पत्र

पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्यासह पुण्यात लॉकडाउन होणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यावरून आता पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

पुण्यात लॉकडाउन लागू करावा की नको, यासंदर्भात आढावा घेतला जात आहे. त्यानुसार वाढत्या रुग्णसंख्येवर प्रशासनाची नजर आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल विभागीय आयुक्त सौरभ राव हे अजित पवार यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतरच लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी व्यापारी महासंघाने पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले, की पुण्यात पूर्ण लॉकडाउन व्हावा अशा मनस्थितीत पुणे व्यापारी महासंघ नाही. कोरोनाविरोधात लढण्यासाठी लॉकडाउन हाच पर्याय नाही. व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. तसेच लॉकडाउनमुळे अनेक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर परिणाम होणार आहे.

याशिवाय फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये मोठं-मोठे विवाहसोहळे होत आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत. पण त्यांच्याकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेक अधिकारी मोठे विवाहसोहळ्यांकडे डोळेझाकपणा करतात. त्यांच्यावर कारवाई करत नाही.

व्यापारी लॉकडाउनविरोधात

पुणे व्यापारी महासंघ विनंती करते, की पुणे शहरात पूर्ण लॉकडाउन करू नये. व्यापारी लॉकडाउनविरोधात आहेत. आम्हाला वाटते पुणेकरही आता त्याचं पालन करू शकणार नाहीत.

हेही सुचवलंय महासंघाने…

– ज्या सोसायटी आणि बंगल्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले. फक्त त्याच सोसायटी आणि बंगला सील करून कडक नियम लावावेत.

– विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

– गटाने जमणाऱ्या लोकांवर जे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत, अशांवर कडक कारवाई करावी.