Pune News : शिवाजीनगर भागातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर ED चा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शिवाजीनगर भागातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या नरवीर तानाजीवाडी येथील मुख्य कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ईडीने (सक्तवसूली संचालनालय)
छापा टाकला. बँकेने केेलेल्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधीत ही छापेमारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. याप्रकरणी बँकेचे संचालक व विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. सध्या चोघेही येरवडा कारागृहात आहेत. याप्रकरणी भोसले यांच्यासह इतरांवर बँकेत 71 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बँकेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परिक्षण करण्यासाठी बँकेने मे. टोरवी पेठे अ‍ॅण्ड कंपनी या चार्टर्ड अकौटंट्स यांची नेमणूक केली होती. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या कंपनीला बँकेची रोख शिल्लक पडताळणी करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यात सहकार आयुक्तालयास सादर करण्यात आलेल्या बँकेच्या अहवालात रोख शिल्लक तपासणीत 73 कोटी 5 लाख 8 हजार 723 इतकी रक्कम कमी असल्याचे समोर आले होते. त्यावर तत्कालीन सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960 च्या तरतूदीअन्वये मे. टोरवी पेठे अ‍ॅण्ड कंपनी या चार्टर्ड अकौटंट्स कंपनीला अपहारास जबाबदार असणार्‍या संबंधीतांविरूध्द गुन्हा नोंदविण्यासाठी 14 नोव्हेंबर 2019 रोजी पत्रान्वये कळविले होते. त्यानुसार चार्टर्ड अकौटंट्स योगेश लकडे (वय 29 , रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी जानेवारी 2020 मध्ये याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानंतर तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवली गेली. त्यानुसार आ. भोसले, त्यांच्या पत्नी रश्मा भोसले यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. याप्रकरणी अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक केली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. भोसले यांच्यासह चौघे सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यात आज ईडीने कार्यालयात छापेमारी केली आहे.