Pune News : वाघोली, नांदेड सिटी, बाणेर, काळेपडळ, खराडी पोलिस ठाण्यांची निर्मिती; लोणीकंद, लोणीकाळभोर, हवेली, चतुःश्रृंगी, हडपसर अन् चंदननगरचं विभाजन होणार, अजित पवारांच्या दालनात होणार तारीख ‘फायनल’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलिस आयुक्तालयात लवकरच 5 नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वाघोली, नांदेड सिटी, बाणेर, काळेपडळ, खराडी पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. यासंदर्भात उद्या (दि. 4 जानेवारी) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पुण्यातील हडपसरचे आमदार चेतन तुपे, वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे, शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित राहणार आहेत.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये अस्तित्वात असलेल्या लोणीकंद पोलिस ठाण्याचे विभाजन करून वाघोली, लोणीकाळभोरचे विभाजन करून ऊरळीकांचन, हवेलीचे विभाजन करून नांदेडिसिटी, चतुःश्रृंगीचे विभाजन करून बाणेर, हडपसरचे विभाजन करून काळेपडळ तर चंदननगरचे विभाजन करून खराडी पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

दरम्यान, नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती 26 जानेवारीच्या मुहूर्तावर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नवीन पोलिस स्टेशनच्या निर्मितीबाबत उद्या (दि. 4 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता मुंबईत बैठक असून लवकरात लवकर पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र, नवीन पोलिस स्टेशनच्या उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचे सांगितले आहे.