Pune News : खळबळजनक ! माजी पोलीस निरीक्षकाच्या मुलावर ‘करणी’; चार महिलांसह 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका माजी पोलीस निरीक्षकाच्या मुलावर करणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने पुण्यात सून आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक मसाजी काळे (वय 58) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सून अपर्णा नितीन काळे (वय 27), अशोक बापूराव डुकरे, चंद्राक्षी अशोक डुकरे, कविता मोहन धोत्रे, तनुजा शिंदे, समीर अशोक डुकरे, मोहन नामदेव धोत्रे यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भादवी कलम 406, 420, 389, 120 (ब), 34 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध अधिनियम 2013 चे कलम 2 (1), (बी)(7) सह 3 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मसाजी काळे यांनी पोलीस निरीक्षक म्हणून दोन वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मसाजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नेमणुकीस होते. दरम्यान त्यांच्या मुलाचा 2017 साली रितिरिवाजने अपर्णा हिच्याशी विवाह झाला होता. यानंतर मात्र सून आणि तिच्या कुटुंबाने त्यांच्या वागण्यानुसार फिर्यादी यांच्या मुलावर एका मांत्रिक बाईचा सल्ला घेऊन करणी केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे. तसेच अघोरी कृत्ये केले आहेत. तर सूनाच्या कुटुंबाने समाजाच्या वधुवर केंद्रात खोटी माहिती देऊन फसवणूक केली असल्याचे देखील म्हंटले आहे. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

या अर्जावर पोलिसांनी चौकशी पूर्ण करून गुन्हा दाखल केला नाही. त्यात तथ्य आढळले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर त्यांनी न्यायालयात अर्ज केली होती. त्यानुसार न्यायालयाने 156/3 नुसार पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशी करा आणि त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.