Pune News : आर्थिक अडचणीतून स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मिलिंद उर्फ बळवंत मराठे यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक अडचणीतून स्वतःवर गोळी झाडून घेतलेले प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60) यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 15 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता.

मिलिंद मराठे हे लक्ष्मी रस्त्यावर मराठे ज्वेलर्सचे मालक आहेत. मराठे यांनी आर्थिक अडचणीतून रात्री आठच्या सुमारास मराठे यांनी सराफी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या कार्यालयात पिस्तूलातून छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती मराठे यांच्या मुलाला मिळाल्यानंतर त्याने तेथे धाव घेतली होती. त्यानंतर त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या 12  दिवसापासून उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मराठे यांचा मुलगा प्रणव याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. टाळेबंदीत त्यांनी एका बँकेकडून कर्जही काढले होते. व्यवसायातील मंदी तसेच आर्थिक अडचणीमुळे माझ्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रणवने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, असे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले.