Pune News : वाघोली परिसरातील प्रसिद्ध एम. बी. अष्टेकर ज्वेलर्समधील दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास; सेल्समनला पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वाघोली परिसरात असलेल्या प्रसिद्ध एम. बी. अष्टेकर ज्वेलर्समधून दीड कोटी रुपयांचे दागिने कामगाराने अपहारकरून पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मात्र केवळ 5 दिवसात त्याचा शोध घेत पकडले आहे. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी सेल्समन प्रवीण रामभाऊ मैड (रा. शिक्रापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दुकानाचे मालक तुषार अष्टेकर (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीत अष्टेकर ज्वेलर्स हे प्रसिद्ध सोन्याचे दुकान आहे. त्याठिकाणी प्रवीण हा सेल्समन म्हणून काही महिन्यांपासून काम करत होता. त्याच्याकडे एक काउंटर दिले होते. तो हे सोने येणाऱ्या ग्राहकांना दाखवणे व त्याची विक्री करणे असे काम करत असे. मात्र त्याने 2 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत एकूण 1 कोटी 49 लाख 8 हजार रुपये सोन्याचा अपहार केला. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पसार झालेल्या प्रवीण याचा शोध घेऊन त्याला पकडले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. त्याला 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.