Pune News : मंडईत भाजी आणण्यासाठी निघालेल्यास चाकूच्या धाकाने लुटणार्‍या चौघांना फरासखाना पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मंडईत भाजी आणण्यास निघालेल्या व्यक्तीला भरदिवसा शिवाजी रस्त्यावर चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या चौघांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. 24 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्या व्यक्तीने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता पण चोरट्यांनी गळ्याला व पोटाला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी आनंद बाळू सोनावणे (वय २२, रा. धानोरी), प्रकाश वामन शिंदे (वय ३०, रा. टाकही मानुर, ता. पाथर्डी), नितीन हरी वेताळ (वय २२, रा.पर्वती पायथा), अर्जुन दमपा थापा (वय ३६, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याबाबत बापू कांटे (वय ४७ ,रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कांटे हे पिंपरीत राहण्यास आहेत. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भाजीपाला घेण्यास ते मंडईकडे जात होते. शिवाजी रस्त्यावर आल्यानंतर चौघांनी कांटे यांना अडविले. तर त्यांच्या खिशात हात घालत जबरदस्तीने अडीच हजार रुपये काढून घेतले. कांटे यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. पण, एकाने गळ्याला तर दुसऱ्याने पोटाला आणि तिसऱ्याने पाठीला चाकू लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चोरटे ऐवज चोरून पसार झाले होते. त्यानंतर कांटे यांनी फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात होता. यावेळी अमोल सरडे व मयूर भोकरे यांना माहिती मिळाली की, शिवाजी रस्त्यावर व्यक्तीला लुटणारे चौघे शनिवारवाड्याच्या पाठीमागे एका रूममध्ये बसले आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, राजेश तटकरे, अभिजित पाटील, जीनेडी, सचिन सरपाले मेहबूब मोकाशी, सयाजी चव्हाण, मोहन दळवी, आकाश वाल्मिकी, अभिनय चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.