Pune News : जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप, बिबवेवाडी परिसरात झाला होता खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पतीला जेवणात शिळा भात दिला म्हणून झालेल्या भांडणांमुळे माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेलेल्या जावयाचा चाकू भोसकून खून करणाऱ्या सासऱ्याला न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला.

सुनील नारायण वाघमारे (वय ४९, रा. बिबवेवाडी) असे शिक्षा सुनावलेल्या सास-याचे नाव आहे. संजय प्रेमानंद देढे (वय २७, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे खून झालेल्याचे नाव आहे. संजय यांचा मित्र नीतेश दीपक कांबळे (वय २४, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांनी याबाबत बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दिली होती. २३ एप्रिल २०१५ रोजी रात्री दहाच्या सुमारास बिबवेवाडी येथील संघर्ष मित्र मंडळ चौक येथे ही घटना घडली होती. संजय आणि नेहा यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात विविध कारणांवरून वाद होत. खुनाच्या घटनेच्या काही दिवस आधी संजय हे दुपारी जेवायला घरी आले होते. तेव्हा रात्रीचा शिळा भात खायला दिल्याने संजय चिडले होते. या कारणाने झालेल्या भांडणावरून नेहा माहेरी गेली होती.

संजय हे मित्र नितेशसह पत्नीला आणण्यासाठी घटनेच्या दिवशी रात्री सासुरवाडीला गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून सुनील याने चाकूने संजय याच्या पोटात, छातीवर ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केला. पोलिसांनी सुनीलसह त्याची पत्नी लक्ष्मीबाई, मेहुणा शिवम आणि संजय यांची पत्नी नेहा हिच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने सासरा सुनील याला खुनाच्या कलमानुसार जन्मठेप आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्नाच्या कलमानुसार पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

जावयाचा मित्रावरही केला हल्ला

या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पोलिस हवालदार संजय पुणेकर यांनी मदत केली. संजय हे त्याचा मित्राला घेऊन पत्नीला आणालया गेले होते. त्यावेळी झालेल्या वादात सार-याने जावयाच्या मित्र असलेल्या फिर्यादींना मांडीवर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.