Pune News : ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवत महिलांची आर्थिक फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू मुलींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवत ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महिलांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मार्च 2018 ते जानेवारी 2020 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अविनाश कळमकर (रा. पनवेलकर होम्स कुंठावाडी अंबरनाथ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरती महेश मेहेर (वय 44, रा. विद्यानगर तींग्रे नगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरती यांचे टिंगरे नगर परिसरात ब्युटी पार्लर आहे. एकेदिवशी अविनाश हा त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये आला. तसेच त्याने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ वोकेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर या संस्थेचा संचालक असल्याचे सांगितले. गरीब व गरजू मुलींना सरकारतर्फे अनुदान मिळवून सरकारी किंवा सीएसआर योजनांमधून मोफत ब्युटी प्रशिक्षण द्यायचे आहे, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. या माध्यमातून तुम्हाला चांगला मोबदला व नावलौकिक मिळेल असे सांगितले.

फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी 35 हजार रुपये दिले. शिवाय त्यांच्या आणखी दोन मैत्रिणींनी ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास 35 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यांनीही 35 हजार दिले. त्यानंतर फिर्यादी व इतर दोन महिन्यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू करून काही महिलांना प्रशिक्षणही दिले. त्याचा मोबदला आरोपीकडे मागितला असता त्याने मोबदला देण्यास टाळाटाळ केली. तसेच परीक्षेचे सर्टिफिकेटही भलत्याच संस्थेमार्फत दिले. त्यामुळे त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.