Pune News : आर्थिक व्यवहारामुळे फ्लेक्सवरील कारवाईला ‘ब्रेक’; तक्रार करणारांना धमकी, पालिकेतील अतिक्रमण विभागाचा प्रताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारामुळे फ्लेक्स आणि होर्डिंग्जवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्ता, विद्युत खांब, पदपथावर अनेक हॉटेल्स आणि दुकानदारांचे फ्लेक्स लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अतिक्रमण विभाग धाडस दाखवत नाहीत. कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी गल्लीबोळातील फ्लेक्सवर कारवाई करीत असल्याने सामान्य नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्जमुळे शहर आणि उपनगराला ओंगळ रूप आहे. मागिल काही वर्षांपूर्वी मंगळवार पेठेत फ्लेक्स कोसळून रिक्षावर पडल्याने जीवित हानी झाली होती. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फ्लेक्स आणि होर्डिंग्जवर दमदार कारवाई सुरू केली. मात्र, ती कालांतराने क्षीण होत गेली आणि पुन्हा शहर आणि उपनगरामध्ये होर्डिंग्ज, फ्लेक्सची भाऊगर्दी दिसू लागली आहे.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयांपासून हाकेच्या अंतरावर हडपसर वेस, भाजी मंडई, सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुल, विद्युत खांब, हॉटेल्स मालकाचे पार्किंग नसल्यामुळे तेथील ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी केली जातात, त्याशिवाय इतर जाहिरातबाजीच्या फ्लेक्सची खच्चून गर्दी हडपसर परिसरामध्ये झाली आहे. भल्या मोठ्या होर्डिंग्जमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे. अशी अनधिकृत आणि बेकायदेशीर होर्डिंग्ज हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाला दिसत नाहीत, कारण त्यांच्याकडून त्यांना दरमहा मलिदा सुरू आहे. गल्लीबोळातील अगदी कोणाचीही तक्रार वा अडचण नाही, अशा ठिकाणी जाऊन अतिक्रमण विभाग कारवाई करून बहादुरी केल्याचे दाखवित आहे. कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी असे प्रकार केले जात असल्याचे दस्तूरखुद्द पालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी सांगितले.

अधिकारी-कर्मचारी आणि होर्डिंग्ज-फ्लेक्सधारकांच्या आतबट्ट्याच्या कारभारामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागत आहे, त्याकडे कोणीही अधिकारी लक्ष देत नाही. तक्रार केली, तर आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत, आमची हद्द नाही, कोणी तक्रार केली, तर त्याचे नाव संबंधित फ्लेक्सधारक आणि होर्डिंग्जधारकाला सांगून दोघांमध्ये भांडण लावण्याचे कृष्णकृत्य करतात, त्यामुळे सामान्य नागरिक तक्रार करण्यासाठी धजावत नाही.