Pune News : बियांची उगवणी न झाल्यानं बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  सोयाबीन पेरणी झाल्यानंतर बियाणांची उगवणी न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या असून, त्यानुसार कृषी अधिकाऱ्यांनी संबंधीत बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात दगडू नानाभाऊ अंभोरे (रा.शिवाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, जुन्नर तालुका कृषी अधिकारी सतीश कारभारी शिरसाठ (वय.48) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणूकीसह बियाणे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्यातील कृषीधन कंपनीचे मुख्य कार्यालय सेनापती बापट रस्त्यावरील एका इमारतीत आहे. या कंपनीने खरीप हंगामासाठी जुन्नर तालुक्यातील सोयाबिनच्या केएसएल 441 वाणाची विक्री केली होती. शेतकर्‍यांनी वाण खरेदी करून पेरणी केली. मात्र, सोयाबीनचे पीक हाती न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत जुन्नर तालुक्यातील शिवाजी आहेर, रोहिदास शिंदे, पांडुरंग दाते, अंजनाबाई शिंदे यांच्यासह 32 शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍याकडे तक्रार दिली होती. विकण्यात आलेली सोयाबीन बियाणे ही 15 ते 30 टक्के निकृष्ट असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर फसवणूक आणि बियाणे कायद्याातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.