Pune News : ‘कॉमन’ मित्राच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर ‘त्या’ दोघांचे सूत जुळले खरे पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॉमन मित्राच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्या दोघांचे सूत जुळले खरे पण प्रियकराने विवाह नोंदणी कार्यालयात लग्नासाठी प्रियसीला बोलावले आणि ती काही क्षणासाठी बाहेर जाताच तेथून धूम ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे तरुणीला मानसिक धक्का तर बसला आहे. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रियकरासोबतच चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रियकर तेजस सुरेश शेलार (वय 33 रा. रासाई बंगला, एरंडवणे) व त्याचे साथीदार मित्र अमित यशवंतराव पापळ (वय 35), अभिषेक यशवंतराव पापळ (वय 33) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला गेला. याबाबत 28 वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी मुळची पणजी येथील आहे. नोकरीनिमित्त ती काही वर्षांपूर्वी पुण्यात आली होती. एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. यादरम्यान एका कॉमन मित्राच्या माध्यमातून तिची अन तेजसची ओळख झाली होती. यानंतर मैत्रीचे रूपांतर त्यांच्यात प्रेमात झाले. तर पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले व वेगवेगळ्या ठिकाणी नेहून शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

नवीन वर्षात दोघे नाशिकला गेले. त्याठिकाणी एका हॉटेलात थांबले. पण यावेळी अचानक तिथे तीघेजण पोलीस असल्याचे सांगत आले. त्यांनी फिर्यादी तरुणीचा मोबाईल, वोटर आयडी कार्ड आदी कागदपत्रे काढून घेतले. यानंतर तरुणीला हे पोलीस नसून, ते आरोपीचे साथीदार असल्याचे समजले. यानंतर तरुणीने लग्नाचा तगादा लावला. यावेळी तेजसने तीला 13 फेब्रुवारी 2021 रोजी मामलेदार कचेरी येथे नोंदणी पध्दतीने विवाह करू असे आश्वासन दिले. दोन दिवसांपूर्वी ते मामलेदार कचेरीत विवाह करण्यासाठी आले असता तरुणी वॉशरुमला गेली. हीच संधी साधत आरोपी तेजस तिला एकटेच सोडून तेथून पळाला. यावेळी तिच्याकडील सर्व कागदपत्रे व बॅंकेचे पासबुक त्याने काढून घेतले होते. ही कागदपत्रे त्याने देण्यास नकार दिला. यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तेजस्वी पाटील करत आहेत.