Pune News : ‘फिनोलेक्स’चे उद्योगपती प्रकाश छाब्रिया यांच्यासह 5 जणांविरूध्द बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी FIR दाखल

पुणे : फिनोलेक्स केबल्स व फिनोलेक्स प्लासन इंडिया या कंपन्यांचे नियंत्रण स्वत:कडे घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी उद्योगपती प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्र्काश प्रल्हाद छाब्रिया, संजय आशेर, डॉ़ सुनिल पाठक, अरुणा कटारा, मीना डिसा आणि इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांचे चुलत भाऊ दीपक किशनदास छाब्रीया (वय ५८, रा. सिंध सोसायटी, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे दिली आहे. ही घटना ३१ मार्च २०१६ रोजी प्रकाश छाब्रीया यांच्या गणेशखिंड रोडवरील घरी व इतर ठिकाणी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दीपक छाब्रीया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे चुलते प्रल्हाद छाब्रिया यांचे ४ जानेवारी २०१४ रोजीचे मृत्यु पत्र व १५  ऑक्टोंबर २०१४ चे अंतिम मृत्युपत्रात त्यांचे मृत्युनंतर त्यांचे नावे असलेले ८२.०७  टक्के  म्हणजे १ लाख १६ हजार ९२२ शेअर्स प्रल्हाद छाब्रीया ट्रस्टला देण्याबाबत नमूद करण्यात आले होते. त्याद्वारे फिर्यादी यांना २९ टक्के व फिर्यादी यांचा भाऊ विजय छाब्रीया यांना १७ टक्के असे फिर्यादीचे भाऊ ऑर्बिट इलेक्ट्रीक प्रा़ लि़ कंपनीचे शेअर्सचे लाभधारक होणार असताना आरोपींनी संगनमत करुन कट रचून फिर्यादी व त्यांच्या परिवारास कंपनीचे एकूण ४६ टक्के शेअर्स अंदाजे २ हजार २१६ कोटी रुपयांच्या किंमतीचे शेअर्सपासून वंचित ठेवण्यासाठी प्रल्हाद छाब्रिया यांचे नावे बेकायदेशीर बनावट गिफ्ट डीड व शेअर्स ट्रान्सफर फॉर्म व शेअर सर्टिफिकेट तयार करुन त्यांचे खोट्या सह्या करुन या कागदपत्रांचा वापर करुन कंपनीचे १०० टक्के शेअर्स पैकी ७०.४० टक्के शेअर्स प्रकाश छाब्रिया यांनी स्वत:चे नावे करुन फिर्यादी व फिर्यादींचे भाऊ हे एक्झीक्युटीव्ह चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर असलेल्या फिनोलेक्स केबल्स प्रा़ लि़ व फिनोलेक्स प्लासन इंडिया प्रा़ लि़ कंपन्यांचे नियंत्रण स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केल्याचे म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.