Pune News : पुण्यातील मुंढवा स्मशानभूमी येथील 7000 स्केवर फूटात असलेल्या फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील मुंढवा परिसरातील स्मशानभूमी येथील एका फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. या आगीत गोडाऊनचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही.

मुंढव्यातील स्मशानभूमी जवळ असलेले हे गोडाऊन 7 हजार स्केवर फूटात आहे. ही जागा कोद्रे यांची आहे. ती जागा राम वर्मा यांनी भाड्याने घेतली आहे. त्यांनी लोखंडी अँगलचे मोठे शेड मारून येथे गोडाऊन केले आहे. जुने फर्निचर तसेच इतर साहित्य येथे आहे.

दरम्यान, मध्यरात्री हे गोडाऊन बंद असताना अचानक येथून धूर येत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दल व पोलिसांना दिली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. गोडाऊन मोठे असल्याने आणखी बंब मागवण्यात आले. आगीचा भडका इतका होता की जवानांना पाण्याचा मारा देखील करता येत नव्हता. त्यानंतरही जवानांनी दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. पण या आगीत गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले. फर्निचर असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. नेमकी आग का लागली हे समजू शकले नाही. सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड, विजय भिलारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

दरम्यान, गोडाऊनची आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास याच परिसरात असलेल्या मुंढवा पोलिस चौकी शेजारील मारुती सुझुकी सेंटरमध्ये भीषण आग लागली. गोडाऊनची आग आटोक्यात आणत असतानाच हा कॉल आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. पुन्हा दुसऱ्या गाड्या मागवत याठिकाणी जवान दाखल झाले. तर काही अधिकारी देखील तेथे आले. अर्धा ते पाऊण तासात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवनांना यश आले आहे. आग नेमकी का लागली हे समजू शकले नाही. पण या आगीत सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही घटनात सुदैवाने कोणीही जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे.