Pune News : रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; मद्रासी गणपतीजवळील इमारतीला लागलेल्या आगीत 3 फ्लॅट, 2 दुकाने जळून खाक

पुणे : रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळील एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली़ या आगीत तळमजल्यावरील दोन दुकाने आणि पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील ३ फ्लॅट जळून खाक झाले. तसेच वॉचमनची केबीनही जळून गेली. अग्निशामन दलाच्या जवानांना एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग विझविण्यात यश आले.

रास्ता पेठेतील अपोलो चित्रपटगृहासमोरील गल्लीत पहाटे पावणेतीनच्या सुमारास तळमजल्यावरील दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाला पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी या आगीची खबर मिळाली. अग्निशमन दलाचे ६ बंब तातडीने घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत ही आग पहिल्या व दुसर्‍या मजल्यांवरील घरांपर्यंत पोहचली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी या घरांमधील लोकांना इतरांच्या मदतीने बाहेर काढले. आगीत वॉचमनची केबीन, तेथेच असलेली एक चारचाकी गाडीही आगीत जळून खाक झाले. इमारतीच्या तळमजल्यावर एक स्पेअरपार्ट व दुसरे चप्पलचे दुकान आहे. या दुकानातून आगीला सुरुवात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही.