Pune News : जांभूळवाडी परिसरात 2 गटात झालेल्या वादाचे पडसाद रात्री उमटले, हवेत गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील जांभूळवाडी परिसरात दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद रात्री उमटले असून, परिसरात येऊन अज्ञातांनी हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजच्या जांभूळवाडी रस्त्यावर दत्तनगर येथे शनीनगर आहे. त्याठिकाणी दुपारी काही मुलांचे वाद झाले होते. हे वाद मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण ते नंतर मिटवण्यात आले. मात्र अचानक शनीनगरमध्ये येऊन काही जणांनी चांगलाच राडा घातला. तसेच त्यातील एकाने हवेत गोळीबार केला. त्याने हवेत 3 ते 4 फायर केल्याची माहिती आहे. सुदैवाने यात कोणी जखमी नाही.

मात्र अचानक झालेल्या गोळीबारानंतर परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारि आता कोणत्या दिशेला जाणार असा प्रश्न आहे.