Pune News : कोंढाव्यात मध्यरात्री तरुणावर गोळीबार, पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा संशय, आरोपी फरार

पुणे (Pune)  : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune) कोंढवा परिसरात मध्यरात्री एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिग्नेश गोरे (वय 19, कोंढवा, खाडी मशीन चौक) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश याच्या मित्रांचे आरोपींसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. यातून हा गोळीबार झाला आहे. मात्र, जिग्नेश याचा या वादशी काही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास जिग्नेश हा त्याच्या घराजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपी दुचाकीवर आले. त्यांनी जिग्नेश याच्या दिशेने एक गोळी झाडली. यात जिग्नेश याच्या मांडीला गोळी चाटून गेली. मध्यरात्री गोळीबार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. जिग्नेश याने तात्काळ नातेवाईक आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. परंतु गोळीबार करणारा मात्र फरार आहे, असे सांगण्यात आले आहे.