Pune News : पहिल्या ऑनलाइन रामनदी महोत्सवाचे आयोजन ! 12 संस्था, 35 महाविद्यालयांचा सहभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  रामनदी पुनरुज्जीवन अभियान सुरू करण्यात आले आहे. याच उद्देशाने किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकाराने पहिला रामनदी महोत्सव ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि वसुंधरा स्वच्छता अभियानाचे अनिल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सव दि ८ ते १० जानेवारी दरम्यान ऑनलाइन होणार असून प्रवेश विनामूल्य असणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते होणार आहे. यांप्रसंगी महोत्सवाचे निमंत्रक आरती किर्लोस्कर व गौरी किर्लोस्कर आपली भूमिका मांडणार आहेत.

आपल्या शहरात राम नदी आहे याची कल्पना पुणेकरांनाच फारशी नव्हती. सुमारे १९ कि.मी. लांबीची ही नदी सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे. ‘या नदीचा इतिहास, भूगोल, जैवविविधता इत्यादी बरोबरच वेगवेगळ्या समस्यांविषयी नदी प्रेमींना जागृत करावे तसेच सक्रिय सहभागासाठी प्रेरित करावे’ हा या महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवात 12 विविध संस्था, ३५ महाविद्यालयांचे हजारो इकोरेंजर्स आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.

पाच भागांच्या या महोत्सवात, अनेक मान्यवरांची रामनदीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी दृक्-श्राव्य व्याख्याने, गेल्या दिड वर्षांत झालेल्या प्रत्यक्ष कामांवर आधारित लघुपट, स्थानिक नागरिकांनी कथन केलेल्या जुन्या आठवणी, सागर कुलकर्णी निर्मित राम नदीचे भारूड, राम नदी संगमाचा आभासी ‘इको ट्रेल’ इत्यादींचा समावेश आहे.

शैलेंद्र पटेल यांचे ‘राम नदी चे झरे व नाले’ या विषयावर, डॉ. गुरुदास नूलकर यांचे ‘समृध्द तळ्यांची राम नदी’ या विषयावर, डॉ. सुरेश मिजार यांचे ‘नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर, शैलजा देशपांडे यांचे ‘विषमुक्त राम नदी’ या विषयावर, ज्योती पानसे यांचे ‘पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन’ या विषयावर, निनाद पाटील यांचे ‘प्रकल्प व्यवस्थापन पध्दत’ या विषयावर आणि अनिल गायकवाड यांचे ‘नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे महत्व’ या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती देणार आहेत.

ज्येष्ठ नागरिक करणार अनुभव कथन…

भुकूम पासून ते बाणेर पर्यंतचे जेष्ठ नागरिक नरहरी, सुभाष आणि शांताराम
माझिरे, अ‍ॅड. नितीन कोकाटे, शांता सबनीस, सुलोचना धनकुडे, भगवान कळमकर त्यांच्या लहानपणीच्या समृध्द राम नदीचे वर्णन करणार आहेत.