Pune News : मुदत ठेवीची रक्कम, व्याज देण्यास टाळाटाळ करणार्‍या डीएसकेंना आणखी एक धक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या विरोधात आणखी एक न्यायनिवाडा झाला आहे. मुदत ठेव स्वरूपात ठेवलेल्या तीन लाखांच्या दोन ठेवी मुदत संपल्यानंतरही व्याजासह परत देण्यास अपयशी ठरलेल्या डी. एस. कुलकर्णी अ‍ॅन्ड ब्रदर्स कंपनीला न्यायालयाने दणका दिला आहे.

तक्रारदाराला त्यांचा ठेवीचे सहा लाख रुपये १२ टक्के व्याजदराने आणि निकालाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत देण्यात यावे, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी दिला. तक्रारदाराला मुदतीत रक्कम न दिल्यास पुढील कालावधीसाठी सहा लाख रुपयांसाठी वार्षिक १५ टक्के व्याज आकारण्यात येईल. तसेच, तक्रारदारांना १० हजार नुकसान भरपाई, तर तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत, असेही आयोगाने आदेशात नमूद केले आहे. याबाबत वरद सुशील पटवर्धन यांनी डी. एस.. कुलकर्णी अ‍ॅन्ड ब्रदर्स व दिलीप सखाराम कुलकर्णी यांच्या विरोधात दावा दाखल केला होता.

पटवर्धन यांनी डीएसके यांच्या कंपनीत ३० मे व १२ सप्टेंबर २०१४ रोजी तीन लाखांच्या दोन मुदतठेवी वार्षिक १२ टक्के व्याजदराने तीन वर्षांकरिता गुंतविल्या होत्या. ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारांना गुंतवलेल्या रकमेवरील व्याजाचा धनादेश देण्यात आला. मात्र ते कंपनीने परत घेतले. त्यानंतर, पटवर्धन यांनी गुंतविलेली रक्कम मागितली असता कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.

अनेक निकाल डिएसकेच्या विरोधात
डीएसके यांच्याकडे गुंतवणूक केलेल्या तसेच त्यांच्या गृहप्रकल्पात घर घेतलेल्यांनी ग्राहक आयोग आणि रेरामध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यातील अनेक निकाल हे डीएसके यांच्या विरोधात गेले आहे. त्यामुळे डीएसकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.