Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वाहनांनी स्वतः काही निमयांचे बंधन घातले, तर अपघात होणार नाहीत. त्यासाठी वाहनांचा वेग मर्यादित असला पाहिजे, कारचालकांनी सीटबेल्ट वापरावा, दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरावे, तसेच ट्रिपलसीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, वाहन तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित जाण्यासाठी आहे, स्पर्धा करण्यासाठी नाही, याचे भाने प्रत्येक वाहनचालकांनी ठेवले पाहिजे, असे सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी सांगितले.

पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाका येथून महामार्ग पोलीस केंद्र बारामती फाटा हद्दीमध्ये 72 वा रस्ता सुरक्षा सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी पाटस टोल नाका व्यवस्थापक अजित सिंग, पोलीस उपनिरीक्षक मेदनाद नवले, महेश कोंडुभैरी, विनोद जोकार, विवेक यादव तसेच वाहनचालक-नागरिक उपस्थित होते. यावेळी वाहनचालकांना रस्ते सुरक्षाविषयक पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.

नांद्रे म्हणाले की, वाहतुकीचे नियम पोलिसांसाठी नाही, तर वाहनचालकांसाठी आहेत. वाहनचालकांनी किमान नियमांची माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. छोटीशी चूक आपले कुटुंब उघड्यावर पाडू शकते. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित ठेवला पाहिजे. रस्त्यावर वाहनांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, त्यामुळे अपघात होत असल्याने प्रत्येकाने वाहन चालविताना भान राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.