Pune News : स्वतःबरोबर कुटूंबियांसाठी वाहतूकीचे नियम पाळावेत, वाहन चालविताना मोबाईल नको

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना मोबाइलवर चित्रपट पाहणे किंवा बोलणे टाळणे स्वतःबरोबर कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मोबाईलवर बोलताना किंवा चित्रपट पाहताना आढळला तर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याबाबत कुठेही तडजोड केली जाणार नाही. वाहतुकीला धोकादायक ठरेल असे ‘इंडिकेटर’ न दाखविणारे आणि सातत्याने हॉर्न वाजवणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे, असे वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेल्मेट न वापरणे, लायसन्स नसणे, सिग्नलचे पालन न करणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, दुचाकीवर ट्रीपल सीट जाणे आदी नियमभंगप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. यंदा १८ लाखांहून अधिक जणांवर नियमभंगाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाईचे प्रमाण एकूण कारवाईच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

दुचाकीवरील ‘डिलिव्हरी बॉय’ किंवा ‘कॅब’ ‘जीपीएस’नुसार सुसाट धावतात. त्यांना सतत मोबाइल सुरू ठेवावा लागतो. त्यासाठी अगदी दुचाकीवरदेखील मोबाइल स्टँड बसविले जातात. तसेच, अनेक चारचाकी गाड्यांत ‘डिजिटल डिस्प्ले बोर्ड’ देण्यात आला आहे. ‘गुगल मॅप’ किंवा गाडी ‘रिव्हर्स’ घेताना मागील दृश्य पाहता यावे, हा त्याचा प्राथमिक हेतू आहे. मात्र, अनेक वाहनचालक त्यावर पिक्चर, गाण्यांचे व्हिडिओ पाहतच गाडी चालवताना आढळतात, ही बाब सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मोबाईलवर बोलणे, चित्रपट पाहणे टाळले पाहिजे.

‘मोटार वाहन कायद्या’नुसार वाहनांचा नोंदणी क्रमांक चार अंकी असतो. मात्र, ‘फॅन्सी नंबर’ प्लेटमुळे या अंकांची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली जाते. त्या पार्श्वभूमीवर नंबर प्लेटवर चारऐवजी एक अंक जरी कमी असला, तरी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, ती अधिक तीव्र गतीने केली जाणार आहे. विक्षिप्त पद्धतीने सतत हॉर्न वाजवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

दोन परवाने बाळगणे गुन्हा
एका व्यक्तीने दोन वेगवेगळे परवाने बाळगणे हा ‘मोटार वाहन कायद्या’नुसार गुन्हा आहे. देशभरात कोठेही परवाना काढताना आधीचा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जमा करावा लागतो. मात्र, अनेकांना त्याची कल्पनाच नसते. त्यामुळे कळत नकळत त्यांच्याकडून हा गुन्हा घडतो. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला आहे.

हात ‘न’ दाखवून अवलक्षण
गाडी चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी ‘आरटीओ’ची टेस्ट द्यावी लागते. त्यामध्ये ‘आठ’ आकाराच्या ट्रॅकवर गाडी चालवताना संबंधितांनी योग्य ‘इंडिकेटर’ चालू करणे बंधनकारक असते. दुचाकी चालकाला ‘इंडिकेटर’सह वळताना हातही दाखवावा लागतो. ही क्रिया योग्य पद्धतीने केली, तरच परवाना दिला जातो. रस्त्यावर गाडी चालविताना स्वत:च्या आणि मागून येणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘इंडिकेटर’ खूपच गरजेचे आहे. अनेकदा समोरील वाहनचालक ‘इंडिकेटर’ न दाखवता वळतात. त्यामुळे मागून येणारी वाहने समोरील वाहनाला धडकून अपघात झाल्याचे प्रकार घडले आहेत.

सिटबेल्ट वापरला, मोबाईलमुळे टेन्शन डायव्हर्ट होते, झेब्रा क्रॉसिंगपूर्वीच थांबले पाहिजे, सिग्नलवर पोलीस नसले तरी सिग्नलचे पालन केले पाहिजे. रस्त्यावर पादचाऱ्यांचा हक्क आहे, त्यामुळे ग्रीन सिग्नल मिळाला तरी नागरिक रस्ता ओलांडत असतील, तर वाहन थांबविले पाहिजे. नियम पालनासाठी वाहनचालकांनी स्वतःपासून सुरुवात केली, तर नक्कीच चांगले बदल घडण्यास मदत होईल.
-नागनाथ वाकुडे, सहायक पोलीस आयुक्त- वाहतूक विभाग