Pune News : अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  दरवर्षी रस्ता अपघातात वाहनाचालकांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक नियम पाळणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, तर नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याची माहिती हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी सांगितले.

हडपसर वाहतूक शाखेमध्ये रस्ता सुरक्षा 2021 अभियानानिमित्त 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान सुरू केला आहे. त्यानिमित्त वाहतूक शाखेसमोर पोलीस नाईक दिनेश टपके, तेज भोसले, मनोज ठाकरे, पोलीस शिपाई प्रमोद पासलकर, महिला पोलीस नाईक योगिता टिळेकर, मनिषा वायसे, काजल कुंभार, सुजाता राऊत, पोलीस हवालदार सुनील बोरकर, विठ्ठल कोलते यांच्या पथकाने वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना, हेल्मेट, सिटबेल्ट, पीयूसी अशी तपासणी करण्यात आली.

चुडाप्पा म्हणाले की, रस्ता सुरक्षेबाबत वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःबरोबर इतरांना आणि कुटुंबीयांना आपण वेठीस धरत आहोत, याचे भान बेसुमार वाहनचालकांनी राखले पाहिजे. त्यासाठी वाहनांचा वेग मर्यादित आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, स्वतःबरोबर समाजहितासाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

79 वाहनांवर केली कारवाई

दादासाहेब चुडाप्पा म्हणाले की, सोलापूर रस्त्यावर वैदूवाडी चौकामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी 79 वाहनचालकांकडून नियम भंग केल्यामुळे 53 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.