Pune News : पुण्यात पहिल्यांदाच 2 तरुणींसह 7 जणांच्या टोळीवर मोक्का, ‘काजल’ आणि ‘अंबिका’ गोत्यात; हडपसर आणि वानवडी परिसरात होती दहशत, शहरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वानवडी परिसरातील सराईत गुन्हेगार गिरीश उर्फ सनी हिवाळेच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. विशेष म्हणजे यात दोन तरुणींसह 7 जणांच्या टोळीवर ही कारवाई केली असून, परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी हे आदेश दिले आहेत.

गिरीश उर्फ सनी महेंद्र हिवाळे (वय 21, रा. म्हसोबा मंदिर, काळेपडलं, हडपसर), आकाश संतोष भारती (वय 20), चेतन पांडुरंग ढेबे (वय 23), अनिकेत उर्फ मॉन्टी शरद माने (वय 20), काजल मधुकर वाडकर (वय 21) अंबिका अर्जुन मिसाळ (वय 21), सूरज महादेव नवगिरे (वय 19) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.

गिरीश उर्फ सनी हिवाळे टोळीप्रमुख आहे. या टोळीची वानवडी व हडपसर परिसरात दहशत आहे. यातील फिर्यादी तरुण नागेश मिसाळ याच्या भावाने आरोपींच्या मित्राचा खून केला. तसेच फिर्यादी हिची नातेवाईक असलेल्या तरुणीला अनिकेत यांच्यासोबत फिरू नको, म्हणला होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. यावरुन त्यांनी फिर्यादी तरुण एकटा असताना त्याच्यावर हल्ला करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यानुसार वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना ही टोळी असून, गिरीश हा टोळी प्रमुख असून, त्याने इतर आरोपींना टोळीत सामील करून घेत परिसरात आपले वर्चस्व रहावे तसेच आर्थिक फायदा होण्यासाठी वापर केला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आरोपी हे परिसरात दहशत माजवत त्याठिकाणी गुन्हे करत होते. त्यामुळे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांनी टोळीवर मोक्काची कारवाई करावी, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली आहे. परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी मोक्कानुसार कारवाईचा आदेश दिला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे हे करत आहेत.