Pune News : माजी खा.भाजपाचे नेते धनंजय महाडिक, मगरपट्टा सिटीतील लक्ष्मी लॉन्सचे विवेक मगर यांच्यासह 3 जणांवर पुण्यात गुन्हा; सर्वत्र प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विवाह सोहळ्यात कोरोना नियमांचे पालन न केल्याने माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांच्यासह 3 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली आहे. रविवारी धनंजय महाडिक यांच्या मुलाचा हडपसर परिसरात शाही विवाह सोहळा पार पडला होता. यामुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर व लान्सचे मॅनेजर निरूपल केदार यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 188, 269, 271 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना 2020 चे कलम 11 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.

हडपसर परिसरात लक्ष्मी लॉन्स आहे. मोठमोठे विवाह सोहळे येथे पार पाडतात. रविवारी रात्री धनंजय महाडिक यांचा मुलाचा शाही विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यासाठी नियम डावलून हजार ते बाराशे लोकांची गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोव्हीडच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या आदेशाचे पालन न करता हजार ते बाराशे लोकांची गर्दी जमवून सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. तसेच अशा प्रकारे गर्दी जमवल्याने कोरोनाचा प्रसार होऊ शकतो याची जाणीव असूनही त्यांनी अशा प्रकारे गर्दी जमवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विवाह सोहळ्यास सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यात ज्येष्ठ नेते शरद पवार, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ,उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. यातील अनेकांनी मास्क घातले नव्हते. त्याचे चित्र या ठिकाणी पहिला मिळाले. तसेच सोशल डिस्टंसिंगचा देखील फज्जा उडाला होता.