Pune : पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पवार यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजीराव पवार हे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे तालुक्यातील खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या शालिनी पवार यांचे ते पती होत. पवार यांच्या एका मुलाचे एका वर्षापूर्वी ऐन उमदीत निधन झाले होते. आता एक वर्षात शिवाजीराव पवार यांचे निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील श्री. काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असलेले शिवाजीराव पवार हे 1992 ते 1997 या कालावधीत पुरंदर पंचायत समितीचे सदस्य होते. मुंबई येथील पुरंदर पतपेढीच्या संचालक पदाची देखील त्यांनी जबाबदारी पेलली होती. मागील काही वर्षापासून प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी पत्नी शालिनी पवार यांना राजकारणात सक्रिय केले. शिवाजीराव पवार यांच्या पश्चात पत्नी शालिनी पवार, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार असून मुंबई येथील उद्योजक केदर पवार हे त्यांचे चिरंजीव आहेत.

शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे पुरंदर तालुक्यातील जेजुरी-वाल्हे-नीरा या भागात शिवसेनेची ताकद वाढली होती. त्यांच्या प्रवेशानंतर पहिल्याच निवडणुकीत पत्नीला जिल्हा परिषद निवडणुकीत एकहाती विजय मिळवून दिला होता. मागील पाच वर्षात ते माजी मंत्री शिवतारे यांचे विश्वासू नेते बनले होते. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वाल्हे नजीक आडाचीवाडी ग्रामपंचायतीवर त्यांची एकहाती सत्ता होती. त्यांच्या निधनामुळे गावकऱ्यांचे, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय लोकांचा आधार तुटला आहे.