Pune News : शिवाजी रस्त्यावर चाकुच्या धाकाने लुटणार्‍या चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मंडईत भाजीसाठी आणण्यास निघालेल्या एकाला भरदिवसा शिवाजी रस्त्यावर चाकूच्या धाकाने लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्याने चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; पण चोरट्यांनी गळ्याला व पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

याप्रकरणी आनंद बाळू सोनावणे (वय २२, रा. धानोरी), प्रकाश वामन शिंदे (वय ३०, रा. टाकही मानुर, ता. पाथर्डी), नितीन हरी वेताळ (वय २२, रा.पर्वती पायथा), अर्जुन दमपा थापा (वय ३६, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याबाबत बापू कांटे (वय ४७ ,रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांटे हे पिंपरीत राहण्यास आहेत. दरम्यान बुधवारी दुपारी चारच्या सुमारास भाजीपाला घेण्यास ते मंडईकडे जात होते. शिवाजी रस्त्यावर आल्यानंतर चौघांनी कांटे यांना अडविले. तसेच त्यांच्या खिशात हात घालत जबरदस्तीने अडीच हजार रुपये काढून घेतले. कांटे यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. पण, एकाने गळ्याला तर दुसऱ्याने पोटाला तर तिसऱ्याने पाठीला चाकू लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चोरटे ऐवज चोरून पसार झाले होते. त्यानंतर कांटे यांनी फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर शोध घेऊन चौघांना अटक केली. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.