Pune News : दत्तवाडीतील युवकाच्या खूनाचा पर्दाफाश, पोलिसांकडून चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दत्तवाडीत सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने दगडाने ठेचून व कोयत्याने सपासप वारकरून केलेल्या खुनाचा उलघडा झाला असून, पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. त्या चौघांनी सात दिवसांपूर्वी त्याचा निर्घृण खून केला होता.

सागर उर्फ सोंट्या संजय लोंढे (वय 19, रा. दांडेकर पूल), करणं उर्फ बिट्या अंकुश जानराव (वय 22), सागर अशोक भालशकर (वय 22) ओमकार उर्फ ओमी बाळू वाघमारे (वय 21,आंबेगाव खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यात पुरुषोत्तम उर्फ संजय वसंत नलावडे (वय 23, रा. सिंहगड रोड) याचा खून झाला होता. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर दत्तवाडी व खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न व चोऱ्या असे गुन्हे दाखल आहेत. तर मयत नलावडे हा देखील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर देखील गुन्हे दाखल होते. दरम्यान त्यांचे पूर्वीपासून वाद होते. त्यातूनच सात दिवसांपूर्वी (दि. 15 जानेवारी) रात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर कोयत्याने वार करत डोक्यात दगडे मारून त्याचा निर्घृण खून केला होता. यानंतर आरोपी पसार झाले होते.

याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस यातील आरोपींचा शोध सुरू होता. मात्र ते सापडत नव्हते. यादरम्यान त्यांचा शोध घेत असताना पथकाला आरोपी हे म्हात्रे पुलाच्या खाली थांबले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या चौघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पूर्वी झालेल्या वादातून खून केला असल्याचे सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुंदन शिंदे, महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर व त्यांचा पथकाने ही कारवाई केली आहे.