Pune News : प्रवाशांना लुटणार्‍या टोळीतील चौघांना मुंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात पीएमपी बस प्रवासात व बस थांब्यावर उभारलेल्या प्रवाशांचे दागिने अन खिसा कापणाऱ्या चौघांच्या टोळीला मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून तबल 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. गेल्या तीन गे चार वर्षांपासून ते शहरात चोऱ्या करत होते.

शितल श्रीनिवास वाडेकर (वय 28, मुंढवा), अविनाश सिद्राम जाधव (वय 27, रा. केशवनगर), सचिन सिद्राम गायकवाड (वय 37, रा. मुंढवा), सचिन दगडू जाधव (वय 38) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरात पीएमपी बस प्रवसात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. तर बस थांबलेल्या व्यक्तींच्या देखील खिशातून पैसे काढत. काही महिने या टोळीने धुमाकूळ घातला होता. पण पोलिसांना मात्र ही टोळी सापडत नव्हती. अगदी गुन्हे शाखा देखील या टोळीच्या मागावर होती. पण ती सापडली नाही. दरम्यान शहरातील सर्वच स्थानिक पोलिसांना हद्दीत गस्त घालत रस्त्यावरच्या वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी बस प्रवसात 48 वर्षीय महिलेच्या जवळील पर्स चोरून नेण्यात आली होती.

याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. यानुसार मुंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलेश पालवे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील महिला केशवनगर भागात येणार आहे. यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचला. तसेच एका महिलेसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी शहरातील विविध भागात चोऱ्या केल्या असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्याकडून बंडगार्डन, स्वारगेट, वारजे माळवाडी, बिबवेवाडी, मुंढवा, डेक्कन या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 11 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भाेसले, सहायक निरक्षक विजय चंदन मुंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलेश पालवे व त्याच्या पथकाने केली आहे.