Pune News : पोलिसांकडे तक्रार केल्याने चौघांकडून महिलेसह तरूणाला बेदम मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शिवीगाळ केल्यानंतर त्याची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून टोळक्याने एका महिलेसह तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपुर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार वडारवाडीत घडला आहे.

प्रशांत विश्वास डोंगरे (वय २८) व रूपेश उत्तम विटकर (वय २० रा. वडारवाडी ) यांना अटक केली आहे. तर दोन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी शीतल धोत्रे (वय ३२, रा. वडारवाडी ) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल व आरोपी वडारवाडीत राहायला आहेत. किरकोळ कारणांवरून प्रशांत व रूपेशने शिवीगाळ केली. त्यामुळे शीतल आणि त्यांच्या मामाचा मुलगा चंदन विटकर पांडवनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले. तक्रार देउन परत माघारी जाताना आरोपींनी शीतल आणि चंदनच्या दिशेने विटा फेकल्या. त्यामुळे शीतल जखमी झाल्या असून सुरेश हनुमंत विटकर यांनाही आरोपींनी विटा मारून जखमी केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.