Pune News : कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांना चौघांकडून धक्काबुक्की

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिग्नल तोडून पळून जाणाऱ्याला थांबविल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने पोलीसाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. कोरेगाव पार्क परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. शशिकांत जयस्वाल (वय ३०) देवेंद्र रामप्यारे जयस्वाल (28) दीपक रामप्यारे जयस्वाल (वय २५) गोविंदा रामप्यारे जयस्वाल (वय २३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अमंलदार नवनाथ पवार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस अमंलदार नवनाथ पवार काल कोरेगाव पार्क जंक्शन चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी शशिकांत जयस्वाल सिग्नल तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पवार यांनी त्याला थांबण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे शशिकांतने त्याचा साथीदार देवेंद्रला बोलावून घेतले. पोलिसांना काय अधिकार आहे थांबवायचा, तुझी नोकरी घालवतो असे म्हणत ते पवार यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना खाली ढकलून देत जखमी केले. त्यानंतर इतर साथीदारांना बोलावून आरोपींनी पवार यांना शिवीगाळ केली. अधिक तपास सहायक निरीक्षक दत्तात्रय शिंदे तपास करीत आहेत.