Pune News : बचत गटाच्या नावाने साडेसोळा लाखाची फसवणूक; दोघींना पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महिला बचत गटाच्या नावे 48 महिलांकडून दरमहा एक हजार रुपये घेत दोन महिलांनी 16 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पौड पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयाने आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुळशी तालुक्‍यातील माले येथे 25 जानेवारी 2017 ते 15 ऑगस्ट 2020 दरम्यान हा प्रकार घडला. सविता भोलेनाथ घाग (वय 43) आणि स्वाती शिवाजी कदम (वय 35, दोघीही, रा. माले, ता. मुळशी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अर्चना चंद्रकांत शेंडे (वय 35) यांनी पौंड पोलिसात फिर्याद दिली आहे. सविता आणि स्वाती या दोघींनी माले येथील 48 महिला गोळा करून 50 महिलांचा सियाराम महा महिला बचत गट चालू केला. दोघींनी प्रत्येक महिलेकडून दरमहा 1 हजार रुपये स्वीकारले. बॅंकेमध्ये खाते उघडून हे पैसे भरणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी बॅंकेत खातेच उघडले नाही. या पैशाचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कमेचा तपास करण्यासाठी दोघींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केली.