Pune News : फुरसुंगीकरांची पाण्यासाठी भटकंती सुरूच, नागरिक म्हणतात – ‘आमची ग्रामपंचायत बरी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे महापालिकेमध्ये मागिल दोन वर्षांपूर्वी नऊ गावे समाविष्ट करून घेतली, ही बाब काहींसाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. मात्र, सामान्य जनतेची आजही पाण्यासाठी वणवण भटकंती थांबली नाही. भेकराईनगर, तुकाईदर्शन, गंगानगर, फुरसुंगीतील काही मंडळी सातववाडी, हडपसरमधून सायकल-मोटारसायकलला कॅन लावून पाण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. भल्या सकाळी सातववाडीमध्ये काही मंडळी पाणी मिळविण्यासाठी सार्वजनिक नळावर गर्दी करीत आहेत, ही बाब निश्चितच लाजिरवाणी आहे. शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी हद्दीत टाकल्यामुळे येथील नागरिकांना किमान पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झालेली नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सातववाडी-गोंधळेनगरमध्ये सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी हडपसरसह फुरसुंगी, गंगानगर, तुकाईदर्शन, भेकराईनगर परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यामुळे किमान पिण्याचे पाणी तरी मिळेल, अशी आशा सामान्य नागरिकांना होती. मात्र, अद्याप त्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत. आम्हाला आमची ग्रामपंचायतच बरी होती, कारण महापालिकेमध्ये समावून घेतल्यामुळे कर वाढला आणि सुविधा मात्र शून्य अशी अवस्था आहे. पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी किमान पाणी तरी द्यावे, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

उरुळी-देवाची आणि फुरसुंगी हद्दीतील कचरा डेपोमुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत खराब झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पिण्याचेच नव्हे, तर वापराचे पाणीसुद्धा विकत घ्यावे लागत आहे. पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण असा सुविधा मिळतील, अशी आशा सामान्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, दोन वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.