Pune News : गुंड अप्पा लोंढे खून खटल्याची येरवडा कारागृहातच होणार दररोज सुनावणी, जेलमध्ये सत्र न्यायाधीशांसमोर खटला चालण्याचे पहिलेच प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून खटल्याची सुनावणी 20 जानेवारीपासून येरवडा कारागृहातील न्यायालयातच सुरू होणार आहे. सत्र न्यायाधीशांसमोर कारागृहातच खटला चालण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. सत्र व विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. सिरसीकर यांच्यासमोर दररोज सुनावणी होणार आहे.

या प्रकरणात मोक्कानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लोंढे याचा भविष्यात जामिनास, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. विकास शहा कामकाज पाहात आहेत. याबाबत अप्पा लोंढे याचा मुलगा वैभव लोंढे (वय 22, उरुळीकांचन, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 28 मे 2015 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना लोंढेचा खून करण्यात आला होता.

कारागृहातच सुनावणी घेण्याबाबाबत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोरख कानकाटे याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी सांगितले की, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयात हजर करताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तसेच न्यायालयात गर्दी देखील होऊ शकते. त्यामुळे कोरोना आणि सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कारागृहातच या खटल्याची सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीशांसमोर कारागृहात सुनावणी होणार असल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.