Pune News : 25 कोटीचं खंडणी प्रकरण : कुख्यात छोटा राजनचा हस्तक ‘ठक्कर’ला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून कोंढव्यात अटक, ‘परमानंद’ला सोपवलं CBI कडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कूविख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक व मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. परमानंद हंसराज ठक्कर (वय 56) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मुंबईतील एकाच जागेची बनावट कागदपत्र तयार करून बांधकाम व्यावसायिककडे पंचवीस कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन उर्फ राजू निकाळजे सह त्याच्या टोळीतील सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमित म्हात्रे आणि परमानंद ठक्कर या चार जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. याप्रकरणी नवी मुंबई सत्र न्यायालयाने छोटा राजन, सुरेश शिंदे,  अशोक निकम आणि सुमित म्हात्रे यांना दोन वर्षे कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, या गुन्ह्यात आरोपी परमानंद ठक्कर हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता. तो गेल्या सहा वर्षांपासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. त्याचा शोध मुंबई पोलीस व गुन्हे शाखा घेत होती. पण तो सापडत नव्हता.दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला परमानंद ठक्कर हा पुण्यातील कोंढवा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने कोंढव्यातील थ्री ज्वेल्स कोलते-पाटील, टिळेकर नगर या उच्चभ्रू वस्तीत छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सीबीआयच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वी खंडणी मागितल्याप्रकरणी आणि जागेचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तसेच चेक बाउन्स झाल्याप्रकरणी 11 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, योगेश जगताप, अजय थोरात, सचिन जाधव, महेश बामगुडे, आय्याज दद्दीकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली आहे.