Pune News : एक वर्षासाठी गजा मारणेचा मुक्काम येरवडा कारागृहात, सातारा पोलिसांनी केली होती अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड गजा मराणेची पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी केली थेट येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. काल मेढ्यात (जि.सातारा) पोलिसांनी त्याला अटक केली होती. एमपीडीएअंर्तगत गजाची एका वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांना हवा असणारा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला मेढा पोलिसांनी काल जेरबंद केले होते. फरार झाल्यानंतर त्याचे वास्तव्य मेढा, वाई, महाबळेश्वर परिसरात होते. शनिवारी मेढय़ात डस्टर गाडीतून तो फिरत असल्याची माहिती मिळताच मेढय़ाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी सापळा रचत गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या होत्या.

तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेल्या गजा मारणे याने जेलमधून पुण्यापर्यंत शक्ती प्रदर्शन करत महामार्गावर धुडगूस घातला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती. मात्र पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा फरार झाला होता. शनिवारी जावळी तालुक्यातील मेढा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणेला काल जेरबंद केले होते.