Pune News : दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांसाठी खुशखबर ! महिनाअखेर पासून 7 ही दिवस पाणी पुरवठा, जाणून घ्या

पुणे (pune) – भामा आसखेड योजनेमुळे (Bhama Askhed scheme) नगररोड परिसरातील नागरिकांची समस्या सुटली असतानाच पाणी पुरवठा विभागाने दक्षिण पुणे (pune) आणि सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत. कात्रज व सिंहगड रस्ता परिसरात आठवड्यातून एकदा घेतले जाणारे ‘ क्लोजर ‘ येत्या महिना अखेरीस बंद करून सातही दिवस पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Superintendent of Water Supply Department Aniruddha Pawaskar) यांनी दिली.

नुकतेच भामा आसखेड योजना (Bhama Askhed scheme)  कार्यन्वित झाल्याने नगररस्ता परिसरातील वडगाव शेरी, विमाननगर, कल्याणीनगर, लोहगाव या परिसरातील नागरिकांचे गेली अनेक वर्षाचे पाण्याचे दुर्भिक्ष संपले आहे. या योजनेनंतर शहराच्या अन्य भागातील पाण्याची समस्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः वडगांव जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या दक्षिण पुण्यातील धनकवडी, कात्रज, बालाजीनागर, सुखसागर नगर, आंबेगाव, कात्रज कोंढवा रोड परिसर आणि सिंहगड रस्ता परिसरात आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. यामुळे पाणी बंद ठेवण्याचा दिवस व त्याच्या दुसऱ्या दिवशी या परिसरातील नागरिकांचे हाल होतात. यावर उपाययोजना करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सरसावला आहे.

यासंदर्भात माहिती देताना पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Superintendent of Water Supply Department Aniruddha Pawaskar) यांनी सांगितले ,की वडगाव जलकेंद्राची क्षमता 200 एमएलडी आहे. यातून वरील परिसराला पाणी पुरवठा होतो. वरील परिसरात क्षमतेपेक्षा पाण्याची मागणी अधिक तसेच पाणी साठवण टाक्यांची संख्या कमी असल्याने विभागनिहाय एक दिवस क्लोजर घ्यावे लागते. नुकतेच कात्रज येथील महादेवनगर येथील टाकीचे काम पूर्ण होऊन वापर सुरू झाला आहे. तसेच बिबवेवाडी येथील समान पाणी पुरवठा योजनेतील टाकीचे ही काम पूर्ण करण्यात आले आहे. याठिकाणी वडगाव आणि पर्वती जलकेंद्रातून पाणी पुरवठ्याचे तांत्रिक वाटप नियोजन पूर्ण करण्यात येत आहे. बिबवेवाडी येथील टाकीतून अप्पर इंदिरानगर आणि सुखसागर नगर परिसरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करून वडगाव जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या उर्वरित परिसराला पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने काम हाती घेण्यात आले असून येत्या महिन्या अखेरीस वडगाव जलकेंद्रातून दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसराला सातही दिवस विना क्लोजर पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.