पुणेकरांसाठी गुड न्यूज ! स्विमिंगपूल, स्पा सेंटर सुरू करण्यास परवानगी; रेस्टॉरंट अन् बार रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील स्विमिंग पूल तसेच स्पा सेंटर सोशन डिस्टन्सिंग बाळगून सुरू करण्यास पुणे महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, बॅक्वेट हॉल तसेच फूड कोर्ट या अस्थाना सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. त्याबाबतच आदेश मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

पुणे मनपा क्षेत्रामधील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. 15 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एसओपीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील स्विमिंगपूल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, फूड कोर्ट सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्री करणार्‍या अस्थापना सकाळी 10 ते रात्री 10.30 या वेळात उघडया असणार आहेत. सर्वांनी शासनाने वेळावेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच नियमावलीचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील स्पा सेंटर सुरू करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे.