Pune News : महापालिकेच्या तृतीय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांना आनंदाची बातमी ! आश्‍वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेमध्ये(PMC) तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणार्‍या सुमारे सहा ते सात हजार कर्मचार्‍यांना आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे. राज्य शासनाच्या आकृतीबंधामुळे सेवा काळात दोन टप्प्यात मिळणार्‍या आश्‍वासित प्रगतीपासून वंचित राहीलेल्या या कर्मचार्‍यांना न्याय देण्यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली असून तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या निवृत्तीनंतर पेन्शनमध्ये वाढ होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

महापालिकेच्या आकृतीबंधाला राज्य शासनाने सप्टेंबर २०१४ मध्ये मान्यता दिली. परंतू ही मान्यता देताना तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी शैक्षणिक आर्हता निश्‍चित केली होती. ही शैक्षणिक आर्हता असलेल्या कर्मचार्‍यांनाच सेवा काळात दर बारा वर्षांनी अशी दोन टप्प्यात आश्‍वासित प्रगती योजना राबविण्याची नियमावली मंजुर केली. आश्‍वासित प्रगती योजनेमुळे या कर्मचार्‍यांचा स्केल वाढतो. यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्या निवृत्तीवेतनातही वाढ होते.

दरम्यान, तृतीय अथवा चतुर्थ श्रेणीमध्ये अनेक वर्षांपासून काम करणार्‍या कामगारांचे शिक्षण हे जेमतेमच असल्याने आकृतीबंधातील शैक्षणिक आर्हतेचा फटका त्यांना बसला आहे. महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा विभागातील सफाई सेवक, वाहन विभागाकडील ड्रायव्हर्स व अन्य विभागात काम करणारे असे सुमारे सहा हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. यांची भरती करतानाच मुळात ४ थी ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची अट होती. त्यामुळे २०१४ पुर्वी या पदांवर भरती झालेल्या कर्मचार्‍यांना आश्‍वासित प्रगती योजनेतून वगळावे व पुर्वीप्रमाणेच त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत होती. २०१५ पासून प्रशासन यासंदर्भात सकारात्मक होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या प्रस्तावावर विक्रम कुमार यांनी त्यानुसार प्रस्ताव तयार केला होता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज त्याला मान्यता दिली, अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली.