पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुंड सुरज ठोंबरे याच्या टोळीतील फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखा त्याचा कसून शोध घेत होती. त्याचवेळी तो बायकोला भेटायला आला असल्याचे समजताच समर्थ पोलिसांनी त्याला पकडले.
गोट्या माने उर्फ नरसिंह भिमा असे अटक केलेल्याचे नाव आहे. सूरज ठोंबरे टोळीवर नुकतीच मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्या टोळीचा गोट्या हा सदस्य आहे.
गोट्यावर सांगवी, फरासखाना व समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो मोक्काच्या गुन्हयात फरार होता. त्याचा गुन्हे शाखा कसून शोध घेत होती. पण तो सापडत नव्हता. दरम्यान गोट्या त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी मंगळवार पेठेतील शाळेजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस नाईक निलेश साबळे, सुमित खुटटे व महेश जाधव यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून गोट्याला ताब्यात घेतले. त्याला मोक्का न्यायालयात हजर केले असता २२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिल लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, विठ्ठल चोरमले, सुुभाष मोरे, हेमंत पेरणे, सचिन पवार, श्याम सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.