Pune News : महाविकास आघाडीत शिवसेनेला मोठे यश, राज्याच्या सर्व भागात भाजप

पुणे (विशेष प्रतिनिधी) :  राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यातून जे जनमत दिसून आले त्याचे अन्वयार्थ आता लावले जाऊ लागले आहेत. राजकीय पक्षांनी आपल्याला मिळालेल्या जागांच्या आधारे निकालाचे दावे केले आहेत. त्यातून एक बाब स्पष्ट होते आहे की भारतीय जनता पक्षाला राज्याच्या सर्व भागातून मतदारांचा कौल मिळाला असून महाविकास आघाडीतील घटक पक्षात शिवसेनेने बाजी मारली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाच्या आधारे राजकीय मतप्रवाह नेमकेपणाने स्पष्ट होत नाही. कारण या निवडणुकांत गावकीचं राजकारणही बऱ्यापैकी मिसळलेले असते. यावेळी मात्र राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती आणि निकालानंतर विजयाचे वेगवेगळे दावे केले आहेत. भारतीय जनता पक्षाने पाच हजार सातशे जागा जिंकल्या असा दावा केला आहे. महाराष्ट्राने पुन्हा एकदा नंबर १ दिल्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी सोशल मिडीयावर मतदारांचे आभार मानले आहेत.

शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार सेनेचे तीन हजार एकशे तेरा उमेदवार निवडून आले आहेत. त्यातच दिलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन हजार चारशे आणि काँग्रेसचे एक हजार आठशे तेवीस उमेदवार निवडून आल्याचे म्हटले आहे.

कॉंग्रेस पक्षाकडून दिल्या गेलेल्या आकडेवारीत शिवसेनेला तीन हजार एकशे आठ, काँग्रेसला दोन हजार पाचशे तेरा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन हजार तीनशे नव्व्याण्णव आणि भाजपला दोन हजार दोनशे त्रेसष्ठ जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेसने दिलेली आकडेवारी पाहता आघाडीत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेसने भाजपला तीन हजाराच्या आतच जागा मिळाल्याचे दाखविले आहे.

राजकीय विश्लेषकांनी निकालांची मांडणी केली आहे त्यात कोकण भागात काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात शिवसेनेला अपयश आले आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मर्यादित यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाला मात्र सर्व भागात कौल मिळाला आहे.

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या खात्यांचा राजकीय आयुधांसारखा वापर भाजपने करूनही शिवसेना जिंकली अशी प्रतिक्रिया सेनेच्या नेत्यांनी दिली आणि भाजपला टोला लगावला आहे, शेती कायद्याचे भांडवल करून मोदी सरकारविरोधात रान उठूनही ग्रामीण भागाने भाजपला साथ दिली आहे, असे दावे भाजपने केले आहेत.