Pune News : प्राप्तिकर विभागातर्फे ‘विवाद से विश्वास’विषया वर 14 ते 16 डिसेंबरदरम्यान मार्गदर्शन शिबीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – करदात्यांना येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) यांच्या वतीने ‘विवाद से विश्वास’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १६ डिसेंबर २०२० या कालावधीत रोज दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणाऱ्या या शिबिरात करदात्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. स्वारगेट, साधू वासवानी चौक, आकुर्डी आणि बोधी टॉवर येथील आयकर भवनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिकाधिक करदात्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन प्राप्तिकर भरण्यातील अडचणी सोडवून घ्याव्यात. मुंबई, पनवेल, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आणि ठाणे येथेही हे शिबीर याच तारखांना होणार आहे. अधिक माहितीसाठी https://bit.ly/3qLzvA4 या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती सहायक प्राप्तिकर आयुक्त विष्णू प्रसाद यांनी दिली

विष्णू प्रसाद म्हणाले, “दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) प्रतिनिधी आणि प्राप्तिकर विभाग पुणेच्या प्रधान मुख्य आयुक्त श्रीमती छवी अनुपम व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत १४ ते १६ डिसेंबर दरम्यान हे शिबीर आयोजिण्याचे निश्चित झाले. या बैठकीत ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्ढा, सचिव व खजिनदार काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.”

दरम्यान, बुधवार, दि. १६ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि प्राप्तिकर विभाग पुणेच्या वतीने ‘विवाद से विश्वास’वर आऊटरीच प्रोग्रॅमचे आयोजन केले आहे. प्राप्तिकर प्रधान मुख्य आयुक्त श्रीमती छवी अनुपम यांच्यासह प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सीए, कर सल्लागार, करदाते, व्यापरी संस्था, व्यावसायिक आदींना या आउटरीच प्रोग्रॅममध्ये सहभागी होता येणार आहे, असे ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी सांगितले.