Pune News : रामटेकडी येथे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकणारा जेरबंद; गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रामटेकडी येथे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ चोरट्या मार्गाने विकणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून एक लाख 7 हजार 301 रुपयांचा आरएमडी व विमल कंपनीचा पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुलफाम इरफान अन्सारी (वय 34, रा. स.नं.108-109, छोटी मज्जिद, राम मंदिराजवळ, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस हवालदार उदय काळभोर व विनायक रामाने वानवडीमध्ये गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना सर्व्हे नं १०८/१०९ रामनगर, छोटी मशिद, राम मंदिराजवळ रामटेकडी, हडपसर येथे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ लपवून ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाकाली सहायक फौजदार बुवा कांबळे, पोलीस हवालदार राजेश लोखंडे, उदय काळभोर, दिनकर लोखंडे, राजेश अभंगे, शाकीर खान, विनायक रामाने, मनोज खरपुडे, अमोल सरतापे आणि गंगावणे यांच्या पथकाने कारवाई करून आरोपीला पुढील कारवाईसाठी वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.