Pune News : हडपसर, काळेपडळ पोलीस ठाण्यांसाठी पोलीस आयुक्त गुप्ता, आमदर तुपे, उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडून जागेची पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरात काळेपडळ आणि फुरसुंगी या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता जागेची पाहणी सुरु करण्यात आली आहे. मोहम्मदवाडी येथे काळेपडळ पोलीस ठाण्यासाठी तर हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाशेजारील जागेत पोलिसांच्या इमारतीसाठीच्या जागेची पहाणी करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस बाळकृष्ण कदम, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील विघ्नहर्ता न्यास समन्वयक डॉ. शंतनु जगदाळे उपस्थित होते.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, हडपसर येथील नाट्यगृहाशेजारी तत्कालीन शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्या प्रयत्नातून पोलिसांसाठी २०१४ मध्ये ३० गुंठे जागा देण्यात आली. या ठिकाणी हडपसर पोलीस ठाणे तसेच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे कार्यालय असे एकत्रित इमारत उभारण्यात येणार आहे. महंमदवाडी येथील पोलीस चौकीच्या परिसरात १५ गुंठे जागा आहे. त्या ठिकाणी काळे पडळ पोलीस ठाणे करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी दोन्ही ठिकाणी आम्ही भेटी देऊन पाहणी केली.

याबाबत आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, मी पुणे शहराचा शहर सुधारणा समिती चा अध्यक्ष असताना सन २०१२-१३ या वर्षात हडपसरला पोलिसांचे एक सुसज्ज भव्य असं कार्यालय असावं यासाठी एक भूखंड राखीव ठेवला होता २०१४ साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन ही करण्यात आले होते. पोलीस दलाला सध्याची जागा आणि मनुष्यबळ अपुरे पडत होते. त्यासाठी वाढीव जागा आणि मूलभूत सोयी सुविधा व्हाव्यात यासाठी मी सातत्याने आग्रही होतो. सततच्या पाठपुराव्यानंतर नव्याने दोन पोलीस स्टेशनला मान्यता आणि हडपसर पोलिसांसाठी साठी सुसज्ज जागा उपलब्ध करून घेण्यात यश आले.

हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहाशेजारील जागेवर पोलिसांसाठी एक भव्य वास्तू निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंढवा पोलीस ठाणेची नवीन इमारत बांधायचे काम सुद्धा सुरु करत आहे. तसेच फुरसुंगी येथे व मोहम्मदवाडी येथील तरवडे वस्तून नवीन पोलीस ठाण्याची इमारत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली.