Pune News : हडपसर वाहतूक विभाग नियोजनात अपयशी; अधिकारी थकित दंड वसुली करण्यात मग्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसरमधील अरुंद रस्ते आणि दररोज वाढती वाहनांची संख्या यामुळे वाहतूककोंडी दिवसेंदिवस जटिल बनत आहे. मगरपट्टा चौकातील वाहतुकीत बदल नागरिकांच्या जीववावर बेतणारा ठरला. तातडीने निर्णय घेत पुन्हा जैसे थे वाहतूक सुरू केली. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्यात हडपसर वाहतूक विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. वाहतूक अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणा फक्त थकित दंड वसुलीसाठी कार्यरत असल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे मत हडपसरमधील अभ्यासकांनी व्यक्त केले. प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनीही याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे.

सोलापूर महामार्ग आणि सासवड महामार्गावरून हडपसर गाडीतळ येथे येणाऱ्या वाहनांची गर्दी होते. उड्डाण पुल असला तरी अनेक वाहने पुलाखालून जातात. पुणे-सोलापूर महामार्ग हडपसरमधून पुण्याकडे जातो, या मार्गावर सोलापूर, पंढरपूर, बारामती, फलटण आदी ठिकाणाहून येणाऱ्या अवजड वाहनांबरोबर कार-दुचाकी वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे बाहेरगावाहून पुणे, मुंबई, नगरकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. मात्र, हे होताना दिसत नाही, त्यामुळे हडपसरमध्ये वाहतूककोंडी जीवघेणी ठरत आहे.

पुणे-सोलापूर, हडपसर-सासवड मार्गावरील पदपथ आणि सायकलट्रॅकवर उभी असणारी वाहने आणि दुकानदारांसह पथारीवाले, फेरीवाल्यांना हटवून मोकळे करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिका, वाहतूक आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करावी. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सरसकट वाहनांसह भाजीविक्रेते, पथारीवाल्यांवर फक्त कारवाई नाही, तर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तसेच पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. पालिकेचा पथ आणि वाहतूक विभागाने यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे.

ॲड. व्ही. व्ही. बोरकर म्हणाले की, वाहतूक विभागाकडून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर जरूर कारवाई केली पाहिजे, याबाबत कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. दुचाकी उचलण्यात तत्परता दाखविली जाते, तशीच तत्परता पदपथावर रिक्षा उभ्या असतात, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. हडपसर गाडीतळ बस डेपोसमोर बसथांबा असून, त्याच्याच समोर पुलाच्या बाजूला आणि पूर्वेकडे पदपथावर रिक्षा उभ्या असतात, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.

हडपसरमधील बहुतेक हॉटेलला पार्किंग नाही, त्या हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर लागतात, ट्रॅव्हल्स आणि खासगी प्रवासी वाहनांसह रिक्षा पोलिसांसमोर उभ्या असतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे स्पष्ट चित्र असूनही कारवाई का होत नाही, हा प्रश्न गंभीर आहे. रस्त्यावरील फेरीवाले, पथारीवाले आणि भाजीविक्रेत्यांनी रस्ता व्यापला आहे. त्यामुळे स्वारगेट येथे संतोष माने एसटी बसचालकाने केलेल्या प्रकाराची पुनरार्वृत्ती झाली, अनेकांचा बळी जाऊ नये, असे वाटत असेल तर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.