Pune News : हवेली, लोणीकाळभोर आणि लोणीकंद पोलिस स्टेशनचा कारभार आता आयुक्तालयातून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहर पोलिस दलात पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवेली, लोणीकाळभोर आणि लोणीकंद पोलीस ठाणी आता पुढच्या आठवड्यापासून समाविष्ट होणार आहेत. त्याची प्रोसेस तीव्र गतीने सुरू झाली असून, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आणि इतर काम सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित तीन पोलीस ठाणे देखील लवकरच येत आहेत.

गेल्या महिन्यात गृहविभागाने पुणे शहर पोलीस दलात नवीन 6 पोलीस ठाण्याना मान्यता दिली. तर ही पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सूचना देखील दिल्या. पुण्यात नवीन ग्रामीणचे लोणीकंद, लोणीकाळभोर व हवेली पोलीस ठाणे समाविष्ट केले आहे. तर पुण्यातील चदननगर पोलीस ठाण्याचे विभाजन करत खराडी, चतुःश्रुगी पोलिस ठाण्याचे बाणेर आणि हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करून काळेपडल पोलीस ठाणे निर्मिती होणार आहे. गृहविभागाने त्याचे आदेश दिले आहेत. पण त्याचे कामकाज सुरू असल्याने प्रत्यक्षात ते आले नव्हते. त्याचे काम जोमात सुरू होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काही जागा देखील या पोलीस ठाण्यांसाठी पाहिल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. त्याच दरम्यान ग्रामीणचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी रविवारी (ता.14) रात्री अचानक लोणीकंद पोलिस ठाण्यातील 58 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाचवेळी केल्या आहेत. त्या सर्वांना 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपुर्वी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत.

आता पुढील आठवड्यात ग्रामीण पोलीस दलातून पुण्यात आलेले हे तीन पोलीस ठाणे सुरू होणार आहेत. त्याची तयारी जोरात सुरू असून, त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, लवकरच म्हणजे काही दिवसात हे पोलीस ठाणे शहरात येतील. त्याचे काम सुरू आहे. येत्या आठवड्यात ते सुरू होतील. तर उर्वरित तीन पोलीसठाणे देखील लवकरच सुरू करण्यात येतील.