Pune News : महिला मसाज करताना त्यानं शूट केला व्हिडीओ, नंतर येऊन केली थेट शरीर संबंधाची मागणी, धनकवडीमधील एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मसाजच्या नावाखाली अनेक मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे व पोलिसांनी कारवाई केल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र, मसाजसाठी येऊन मसाज करतानाची व्हिडिओ क्लिप काढून ती व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे पहिलाच गुन्हा दाखल झाला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी सुरेश किसन माने (वय ३२, रा. धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना मार्केटयार्डातील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात १३ ते १५ जानेवारी दरम्यान घडली.

याप्रकरणी मसाज करणार्‍या एका महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्याचे काम करते. सुरेश माने हा ग्राहक म्हणून या केंद्रात आला होता. त्याने तेथे मसाज करुन घेतला. मसाज करताना त्याने फिर्यादीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले व नंतर पुन्हा या महिलेशी संपर्क साधला. हा व्हिडिओ दाखवून माझ्या सोबत शरीर संबंध कर नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी दिली.

हा व्हिडिओ तिच्या मोबाईलवर पाठवून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शहरात अनेक ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांच्या कारवाईत दिसून येते. पण अनेक केंद्रावर आरोग्याच्या दृष्टीने मसाज सेवाच पुरविली जाते. एक व्यवसाय म्हणून असंख्य महिला या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. मात्र मसाजचे काम करते म्हणून त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते. त्यांच्याकडूनही अशाच भलत्या अपेक्षा ठेवल्या जातात.