Pune News : आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत पुणेकरांचे आरोग्य जपले : वैशाली जाधव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोविड -१९ चा यशस्वीपणे मुकाबला करण्यात डॉक्टर ते सफाई कामगार अशा सर्वच घटकांचे योगदान मोलाचे ठरले आहे. या सर्वांनी जीवाची बाजी लावत पुणेकरांचे आरोग्य जपले, अशा शब्दांत पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख वैशाली जाधव (Vaishali Jadhav)  यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेचा गौरव केला.

राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त टिम्बर मार्केट परिसरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे आरोग्य क्षेत्रातील कोविड योद्ध्यांचा शुक्रवारी (दि. ८) सन्मान करण्यात आला. त्यावेळी वैशाली जाधव बोलत होत्या. या वेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सरचिटणीस एस. के. पळसे, रांका हॉस्पिटलचे अनिल शर्मा, गॅलेक्झी हॉस्पिटलच्या रुपाली माने, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. अमित अग्रवाल, डॉ. सौरभ अंबपकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्कारार्थींमध्ये खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर ते कंत्राटी कामगार अशा विविध घटकांचा समावेश होता.

सुनील शिंदे म्हणाले, ”पोटची मुलं, कुटुंबीय, स्वतःचे आरोग्य यापैकी कशाचीही पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड-१९च्या महामारीच्या काळात आपले कर्तव्य बजावले. यासोबतच महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनीही जीवाची बाजी लावून पुणेकरांचे आरोग्य जपले. सेवा बजावताना वैशाली जाधव यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. यातून बऱ्या झाल्यावरही त्यांची आरोग्यसेवा सुरूच आहे. त्यांच्या रुपात आपण सर्वांनी देवदूत अनुभवला. कोविडने थैमान घातले असताना सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा हे समाजावर ऋण आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना व्यवस्थित वेतन आणि पुरेशा सोई-सुविधा मिळत नाही. त्या उपलब्ध व्हाव्या, यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ प्रयत्न करणार आहे.