Pune News : ‘सीरम’च्या विरोधातील ‘त्या’ दाव्याबाबतची सुनावणी 19 जानेवारीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  “सीरम इन्स्टिट्यूट आफॅ इंडिया’ (सीरम) बनवत असलेल्या लशीच्या नावावर नांदेड येथील “क्‍युटीस बायोटीक’ या कंपनीने हरकत घेतला आहे. “कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही “सीरम’च्या आधी सुरवात केली आहे. त्यामुळे लशीचे नाव बदलावे, अशी मागणी करणारा दावा कंपनीने येथील जिल्हा न्यायालयात केला आहे.

आम्ही 29 एप्रिल 2020 रोजी “कोव्हिशिल्ड’ हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी रजिस्टर कार्यालयाकडे अर्ज केला होता. “सीरम’ने त्यानंतर म्हणजे तीन जून 2020 रोजी अर्ज केला आहे. ट्रेडमार्कला अर्ज केल्यानंतर आम्ही कोरोनाशी लढा देण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरसारखे उत्पादने 30 मे पासून बनवायला व त्याची विक्री करण्यास सुरवात केली आहे. हे सर्व उत्पादन “कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कखाली उत्पादित व विक्री केली जात आहेत. मात्र आता “सीरम’ने त्यांची लस “कोव्हिशिल्ड’ या नावाने बाजारात आणण्याची तयारी केल्याने ट्रेडर्स आमची उत्पादने घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसत आहे, असे दाव्यात नमूद आहे. ऍड. आदित्य सोनी यांच्यामार्फत “क्‍युटीस’ने ही याचिका दाखल केली आहे.

“कोव्हिशिल्ड’ हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी “क्‍युटीस बायोटीक’ आणि “सीरम’ या दोनही कंपन्यांनी अर्ज केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही कंपनीला हा ट्रेडमार्क देण्यात आलेला नसून त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

“सीरम’ला न्यायालयाची नोटीस

“क्‍युटीस’ने दाखल केलेल्या दाव्यानंतर न्यायालयाने “सीरम’ला नोटीस बजावली आहे. तुमच्या विरोधात दावा दाखल झाला आहे. त्यात ट्रेडमार्क वापरण्याबाबत हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत मनाई आदेश का देऊ नये? यावर तुमचे म्हणणे मांडा असे त्या नोटिशीत नमूद आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजी होणार आहे.