Pune News : हडपसरमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणातील बदल आणि कोरोनाची वाढती संख्या सर्वांचीच डोकेदुखी ठरली आहे. गुरुवारी (दि. 18) दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आकाशामध्ये ढग दाटून आले आणि ढगांचा गडगडाट, सोसायट्याचा वारा आणि रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची काही वेळ तारांबळ उडाली.

अवकाळी पावसामुळे शेतमालासह उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे भाजीविक्रेत्यांसह फेरवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

मागिल चार-पाच महिन्यांपासून कोरोनाचा ज्वर कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती दूर झाली होती. मात्र, मागिल तीन-चार दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, शासनाने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊनमध्ये कंपन्या, उद्योग-धंदे व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच आता कुठे तरी सर्व सुरळीत होत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यातच मागिल चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण, तर आज सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आकाशामध्ये काळेकुट्ट ढग दाटून आले. हवामान खात्याने पावसाचे संकेत दिले आहेत.