Pune News : हॅलो…हॅलो मी चंद्रकांत पाटील बोलतोय; कॉल टू गेरा बिल्डर…हॅलो मी खासदार अमोल कोल्हे बोलतोय, नागरिकांना मदत करा, निधी द्या ! खंडणी विरोधी पथकाकडून दोघांना ‘खाक्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   लॉकडाऊन काळात शहरातील एका प्रसिद्ध बिल्डरला फोन करत मी राष्ट्रवादीचा खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करत फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाने पकडले. त्याने यापूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने देखील फोन केले होते.

विशाल अरुण शेंडगे (वय ३२, रा. टिळेकर नगर, कोंढवा) व त्याला मदत करणारा सुरेश बंडू कांबळे (रा. गंज पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत गेरा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहितकुमार गेरा (रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात गेरा बिल्डर्स यांना आरोपीने शेंडगे याने फोन केला. खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगून नागरिकांना काही तरी मदत करा, निधी द्या, असे सांगून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. याबाबत गेरा यांनी चौकशी केली असता त्यांना खासदार कोल्हे यांनी फोन केला नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिस आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रार अर्जाची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी केली जात होती. त्यावेळी कोल्हे यांच्या नावाने फोन करणारी व्यक्ती शेंडगे असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड व त्यांच्या पथकाने शेंडगे याला पकडले. त्याला मदत करणारा आरोपी कांबळे याचा शोध सुरू आहे. शेंडगे याने आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या पीए असल्याचे सांगून नागरिकांना फोन करून पैसे उकळले आहेत. याप्रकरणात आतापर्यंत त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. तो एका गुन्ह्यात अटक होता. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने हा प्रकार केला आहे.